कुर्डू
कुर्डूची भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीस शेताचे बांध, पायवाट, मोकळी व पडीक जमीन, जंगल अशा ठिकाणी आपोआप रुजते. कुर्डुची रानभाजी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. माठवर्गीय कुळात मोडणारी ही अतिशय रुचकर व बहुऔषधी गुणांनी युक्त रानभाजी आहे. बारीक व तांबूस खोडाला गोलाकार आकाराची पाने येतात. ही रानभाजी कोवळी असताना खाण्यातच खरी मजा असते. कुर्डूच्या कोवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात. कोकणातील जाणकर माणसे असे तुरे खुडून भाजीसाठी आणतात. कुर्डूची भाजी ओळखण्यासाठी खूप सोपी आहे. खुडून आणलेली कुर्डूची भाजी धुवून चिरतात. माठाच्या भाजीप्रमाणेच ही कुर्डूची भाजी शिजवतात. पातळ व सुकी अशा दोन्ही पद्धतीने शिजवलेली कुर्डूची भाजी अतिशय रुचकर व चविष्ट लागते. पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पुढचे तीन महिने ही रानभाजी मुबलक प्रमाणात परिसरात उपलब्ध होते. साधारण सप्टेंबर महिन्यात अशा वाढलेल्या कुर्डूला फुलांचे रंगीत तुरे येतात. ही फुले परिपक्व होऊन सुकल्यावर अगदी माठासारख्याच काळ्या बिया तयार होतात. फुले सुकून गेली की या बिया पडून सर्वत्र पसरतात. याच बिया पावसाळ्याच्या सुरुवातीस उगवतात. कुर्डुच्या काळ्या बिया मूतखड्याच्या आजारावरही अतिशय गुणकारी आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अशा कुर्डुची भाजी तीन चार वेळेस खाल्ली तरी आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
कोकणातील रानभाजी कुर्डू