प्रवास दशावताराचा : लोककलांचा समृद्ध वारसा या महाराष्ट्र भुमीला लाभला आहे. मौखिक आणि ग्रांथिक अशा दोन भक्कम तीरांमधून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रवाह अखंडपणे आजही आपल्याला वाहताना दिसतो. महाराष्ट्राच्या लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या एकत्रिकरणातून उभी राहते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती. अशाच या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात आपले वेगळेपण सिध्द करणारा लोककला प्रकार म्हणजे कोकणचा दशावतार.
गायन, वादन आणि पदन्यास, अभिनय यांचा सुरेख समन्वय दशावतार लोककलेत साधला गेला आहे. लोकांचे मनोरंजन करीत त्यांना नीतीच्या मार्गाची कास धरायला सांगणारी लोककला म्हणजे दशावतार, म्हणूनही ती आजही लोकमान्य आहे. ह्या लोककलेचे शरीर जरी मनोरंजनाचे असले, तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे. दशावताराचे अस्तित्व हे आजही लोकजीवनाशी बांधलेले आहे, याची प्रचिती आजच्या डिजिटल जमान्यातही येते. भारतात अनंत काळापासून नांदत आलेली संस्कृती, त्यातून व्यक्त होणारा सहजसुंदर आविष्कार घडविणारी दशावतार लोककला अनेक परिवर्तनांतून आपला वाटा शोधीत जनलोकांत आपले स्थान आजही टिकवून ठेवण्यात यशस्वी झाल्याचे दिसते.
- प्रा. वैभव खानोलकर
.....
मुळातच लोककलांची निर्मिती लोकसमुहांतून, लोकांच्या एकत्रिकरणातून होते. लोककला ही तिथल्या मातीतून उगवते, ती दुसऱ्या प्रांतातून आणताच येत नाही. ती कोण्या एका घराण्याची, एका माणसाची वा कुटुंबांची किंवा विशिष्ट एकाच जातीची नसते.
लोककलेच्या इतिहासाला पुराव्यांची गरज असते. दंतकथेवर इतिहास कदापी लिहिला जात नाही आणि त्यावर विश्वासही ठेवला जात नाही. दशावतार याच मातीतून उगवलेल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे तळकोकणातील आपली पेटारा संस्कृती. आजही अनेक गावांत बारापाचाच्या देवराठीत सामावलेले पेटारे यांची साक्ष देतात. दशावतार लोककलेला स्वतःची समृध्द परंपरा लाभली आहे. त्यामुळे दशावतार लोककलेतील गायन, वादन, नृत्य आणि अभिनय या गुणांमुळे तिचे इतर लोककलांपेक्षा विशेष वेगळेपण जाणवते. दशावतार लोककला करमणूक व ज्ञानाचे आदानप्रदान करण्याचे उत्तम साधन आजही मानले जाते. स्वातंत्रपूर्व काळात सुध्दा याच दशावतार लोककलेच्या माध्यमातून जनतेमध्ये देशप्रेम जागरूक करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे दशावतार लोककला स्वातंत्र्य चळवळीचाही भाग झाल्याची साक्ष गोव्यासह कोकणप्रांत देतो.
अनेक दशकांची परंपरा लाभलेला दशावतार आज मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. अनेक उच्च पदवीधर युवक आज याच लोककलेच्या माध्यमातून आपली नवीन ओळख निर्माण करताना दिसतात. या लोककलेच्या समृध्दतेचा वारसा परंपरेने जपणारी अनेक घराणी आज सिंधुदुर्गात आहेत आणि ही घराणी परंपरा जपत दशावतार पुढे घेऊन जात आहेत;
मात्र पूर्वीच्या दशावताराचे स्वरूप खूपच बदलून गेल्याचे दिसते. अर्थात, याच बदलणाऱ्या रुपाचे मापन करताना हा बदल तडजोड आहे की अपरिहार्यता, याचे उत्तर मात्र ''कालाय तस्मै नमः" असेच द्यावे लागेल. कारण लोककला आपला मूळ बाज तसाच ठेवून परावर्तित होत असते आणि काळानुसार त्यात बदल अपेक्षित असतात. पूर्वी चार मेंढी, दोन खुर्च्या आणि एक बाकडा इतकेच नेपथ्य असलेल्या लोककलेचा प्रसार पायी चालत झाला. रात्रभर मशालीच्या प्रकाशात धयकाले सादर होऊ लागले.
सुरुवातीला झाडाच्या पानांपासून हिरवा, कोळशापासून काळा आणि नदीतील दगडापासूनही रंग तयार करून वापरले जायचे. भरजरी वस्त्र परिधान करण्यासाठी आवश्यक पैसे कलावंतांकडे नव्हते. अशावेळी उपलब्ध असलेल्य साड्या, सोवळे, उपरणे आदी गोष्टींचा वापर त्यावेळी वेशभूषेसाठी करून दशावतार सादर केले गेले आणि लोकांनी ते स्वीकारले.
एकाच बाकावर स्वर्ग, पाताळ, अरण्य, राजमहाल आदी उभे करण्याची किमया दशावतारी कलावंत चार मेंढीच्या सहाय्याने उभ्या असलेल्या मंडपाखाली अन् प्रसंगी मंदिर नाट्यप्रयोगात सादर करताना दिसतात. पूर्वीच्या काळी रंगमंचावर कोणत्याही प्रकारची साऊंड सिस्टीम उपलब्ध नव्हती. अशा वेळी आपल्या आवाजाचा स्तर उंचावण्यासाठी मोठ्या आवाजात बोलणे क्रमप्राप्त ठरले आणि रसिकांनी ते स्वीकारले. आजही हा बाज दशावतार लोककलेत जपलेला दिसतो. काळ बदलला आणि पायी चालणारा दशावतारी कलावंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने आपल्या पेटाऱ्यासह गावागावांत पोहोचू लागला. अलिकडच्या काळात हेही दृश्य बदलले आणि बहुतांश नाट्यमंडळांनी स्वतः च्या मोठ्या गाड्या घेतल्या. कलावंत आलिशान गाडीतून सफर करू लागले. पूर्वीच्या मशाली, पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांची जागा आता बल्ब, हॅलोजन यांनी घेतली. रंगसंगती, वेशभूषा यात कमालीचा बदल झाला.
कालपरत्वे दशावतार लोककलेत बदल झाले; पण मूळ बाज न ढळू देता दशावतार लोककला बहरली. लिखित संहिता नसलेले, स्त्री व्यक्तिरेखा आजही पुरूष साकारतात, स्वतःचा मेकअप, वेशभूषा, केशभूषाही आपली आपणच हे दशावतार कलाकार करतात. कमीत कमी खर्चात मनोरंजक आणि प्रबोधन करणारे सर्वसामान्य लोकांचे आवडते मनोरंजन माध्यम म्हणजे दशावतारी नाटक.
आज दशावतार ''हायटेक'' झाले आहे. रंगभूषा, वेशभूषा यात कालपरत्वे बदल झाले. आजच्या घडीला ''ट्रिकसिन'' हा नवा ट्रेंड दशावतार लोककलेत आला आहे. ट्रिकसिन म्हणजे हालता देखावा. याला चलचित्र असेहू म्हणतात; मात्र दशावताराचा मूळ ढाचा न हलवता नाट्यप्रयोग विविध देखावे, चलचित्र सामावून घेऊन केला जाऊ लागला. ट्रिकसीन रसिकांसाठी पर्वणी ठरली. रसिकांनी दशावतारातील नावीन्यपूर्ण बदलाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि केवळ दहा-पंधरा हजार बिदागीत सादर केली जाणारी नाटके ट्रिकसिनमुळे थोडी वाढीव किंमतीत सादर केली जाऊ लागली. देखाव्यातील विविध प्राणी आणि आकाशातून भ्रमंती करणारे देव आदी गोष्टी नाटकाची रंगत वाढवतात, ही गोष्ट रसिकमनाला भावली.
थोडक्यात, दशावतार लोककला बदलत चालली ही जरी वस्तू स्थिती असली, तरीही आपला मूळ गाभा अबाधित राखण्यात यशस्वी झालेल्या दशावताराला कोणत्याही गोष्टीसाठी तडजोड करावी लागली नाही. हा बदल अपरिहार्यता म्हणून स्वीकारावा लागला. काळासोबत चालणे शक्य होण्यासाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी केलेले बदल हे नक्कीच गुणवत्तापूर्ण आणि अनुकूल आहेत.
पूर्वी दशावतार हा हंगामी व्यावसाय होता. तुळसी विवाहापासून साधारण पाच ते सहा महिने धयकाल्यांसह नाटके चालायची. मेनंतर मात्र दशावतार ठप्प असायचा. आज दशावतार संयुक्त नाटक हा नवा ट्रेंड उदयास आला आहे. वेगवेगळ्या नाट्यमंडळांत विखुरलेल्या कलावंताचा एकत्रित कलाविष्कार पाहाण्याची संधी या नव्या ट्रेंडमुळे निर्माण झाली आहे. वाक्चातुर्य, भाषा शैली, प्रश्नोत्तरे, संवाद, जुगलबंदी आदी गोष्टींसोबतच पुराणातील विविध विषयांचा सखोल अभ्यास कलावंतांकरवी संयुक्त नाटक करताना दिसू लागला. जून महिन्यात धो-धो पडणाऱ्या पावसात अगदी रेनकोट, छत्री घेऊन रसिक संयुक्त नाटकाची जुगलबंदीचा आनंद घेऊ लागले.
आज गावागावांत संयुक्त दशावतार सादर होऊ लागले आहे. नेहमीपेक्षा मिळणाऱ्या मानधनापेक्षा कलावंतांना आधिक मानधनवाढ दिली जाऊ लागली. थोडक्यात, दशावतारात बदल झाला; मात्र तो काळानुरूप. आज दशावतार बारमाही चालते, हा बदल निश्चितच आश्वासक आहे.
दशावताराचे बदलते स्वरूप