मुरुडचे परब कुठे गेले?
साधीभोळी माणसं ही सोलकढी किंवा पेढे असतात. काही दिवस टिकतात आणि नंतर आठवणी मनाच्या कोपऱ्यात ठेवून निघून जातात. अशा माणसांचा पत्ता नसतो, मोबाईल नंबर नसतो, त्यांचा ईमेल आयडी, फेसबुक प्रोफाइल नसतो. पण ते कुठे ना कुठे असतात. असेच एक आहे मुरूडचे परब. त्यांची ओळख करून देत आहेत निरेन आपटे.
मुरुड हा सुंदर सागरी किनारा जेव्हा अजिबात गजबजलेला नव्हता तेव्हा पहिल्यांदा मुरुडला गेलो होतो. साधारण २० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुरूडच्या समुद्र किनारी " किनारा" गेस्टहाऊस होतं.
तिथे रूम बुक करून आम्ही सामान ठेवत होतो इतक्यात मागून आवाज आला.
" भाऊ नाश्ता- जेवण लागलं तर सांगा...सकाळी पोहे, जेवणामध्ये पापलेट, सुरमई आणि सोलकढी…पाहिजे तर चपाती-भाजी आहे "
आमच्या मागे कुरळ्या केसांचे, हाफ प्यांट घातलेले परब उभे होते. चेहऱ्यावर मनमोकळ हसू. अगदी नारळी-पोफळीच्या बागांसारखं.
आम्ही परबांची "भाऊ" ही गोड हाक ऐकून दुपारचं जेवण परबांकडेच घेतलं.
"भाऊ, आज बोइटा घावला आहे " असं म्हणून त्यांनी ताटात बोइटा हा मासा वाढला. आम्ही तो पहिल्यांदाच पाहत होतो. परबांची "भाऊ" हाक, कोकणी माणसासारखे निरागस हसू, मनापासून सोलकढीचा आग्रह करणे हे सगळे आवडत गेले. आम्ही पुढील पाचही दिवस परबांकडेच जेवत राहिलो.
मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावर अप्पा हे वयस्कर मालक "किनारा" गेस्ट हाऊस चालवत होते आणि त्यांनी पुढची मोठी गॅलरी त्यांनी परबांना खानावळ चालवण्यासाठी दिली होती. मुरूडमध्ये पर्यटक फक्त शनिवार-रविवारी यायचे. आम्ही ते वार टाळले होते. त्यामुळे परबांकडे फक्त आम्हीच गिऱ्हाईक होतो.
त्यांनी मला "भाऊ " आणि पत्नीला " वहिनी " करून टाकलं होतं. आपोआपच परब आमचं नाव-गाव न विचारताही जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखे मनमोकळ्या गप्पा मारत होते.
समोर अथांग सागर पसरलेला होता. त्याच्या लाटांची गाज आमच्यापर्यंत येत होती. आणि परब मुरुडची माहिती सांगत होते.
परब म्हणले, " समोर समुद्रात एक किल्ला दिसतो. अनेकजण यालाच आधी जंजिरा समजतात. पण हा कांसा किल्ला. कासवासारखी पाठ असलेला खडक इथे होता. सिद्दीच्या जंजिरा किल्ल्यावर ताबा ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. म्हणून या किल्याला कांसा नाव पडलं. पद्मदुर्ग असही नाव किल्ल्याला आहे. पण पर्यटकांना हे माहित नाही. मुरुड-जंजिरा नाव ऐकून लोकांना हाच जंजिरा वाटतो. जेव्हा लोक जंजिर्याला जातात तेव्हा त्यांना जंजिरा कोणता ते कळतं.... पण कांसा उध्वस्त झाला. तिथे कोणी जात नाही."
मुरुडमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे. पावसाळ्यात गारंबी धबधब्याचं फेसाळतं रूप फार मोहक दिसतं. अलिबागच्या दिशेने गेल्यावर मधे काशीद समुद्र किनारा लागतो. ही सगळी माहिती परबांनी दिली आणि आम्ही ती सगळी ठिकाणे पाहत निघालो. दत्त मंदिर नक्की पहा असा आग्रह परबांनी केला म्हणून तिथे गेलो. हे मंदिर मुरुड जवळ एका डोंगरावर आहे. बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर दिसते आणि आणखी महत्वाचं म्हणजे तिथून मुरुडचा भव्य सागरी किनारा दिसतो. नारळाची भरपूर झाडे, कौलारू घरे आणि निळ्याशार सागराच्या फेसाळत्या लाटा पाहून डोळ्याची पारणे फिटतात. क्षितिजापर्यंत पसरलेल्या सागराचं इतकं सुंदर आणि विहंगम दृश्य क्वचितच पाहायला मिळतं.
मुरुडमध्ये आठवडाभर मुक्काम केला. परब रोज कोकणी जेवण वाढत होते आणि ग्लास भरून सोलकढी पाजत होते. आम्ही पाच दिवस कोकणी जेवणाची लज्जत चाखली.
आमची सुट्टी संपली. परबांचा निरोप घेवून आम्ही निघालो.
त्यानंतर ५ वर्षाने पुन्हा मुरुडला गेलो. बसमधून उतरल्यावर सरळ "किनारा" गेस्ट हाऊस गाठलं. पण पाहतो तर काय, "किनारा" बंद पडलं होतं. मनात प्रश्न आला, परब कुठे गेले?
शेजारच्या नारळ पाणी विकणाऱ्याकडे चौकशी केल्यावर त्याने बोट दाखवले. समुद्र किनार्यावर परबांना एक भाड्याने जागा मिळाली होती. वर नारळाची झाडे होती आणि खाली परब झापाच्या घरात खानावळ चालवत होते. त्यादिवशी मुरूडमध्ये चांगली गर्दी जमली होती. त्यामुळे कुरळ्या केसांचे परब भराभर हात चालवत होते. अनेकजण जेवत होते.
आम्ही दोघे परबांसमोर उभे राहिलो. पण परबांनी ओळखलं नाही. शेवटी आम्हीच ५ वर्षापूर्वीची ओळख सांगितली. परबांना खूप आनंद झाला. आपल्याला कोणी तरी शोधत आलं हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मग परबांनी आम्हाला पुन्हा एकदा प्रेमाने जेवू घातलं आणि सोलकढीचा आग्रह केला. नारळाचं दूध आणि कोकम असं मिश्रण असलेलं ती गुलाबी सोलकढी खूप गोड लागली.
उद्या आम्ही सकाळी पहिल्या बसने निघणार हे आम्ही गप्पा मारताना परबांना सांगितलं. तोवर रात्रीचे १० वाजले होते. परबांनी पटापट खानावळ बंद केली आणि आम्ही त्यांचा निरोप घेवून निघालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही बसमध्ये बसलो होतो. बसची घंटी वाजली आणि इतक्यात परब बस स्थानकात "भाऊ!!" अशी हाक मारत धावत धावत शिरले. त्यांच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती. आम्हाला वाटलं आम्ही काल त्यांच्या खानावळीत काहीतरी विसरलो. घाईघाईत त्यांनी खिडकीतून पिशवी माझ्या हातात दिली आणि तोवर बस निघाली. परबांना टाटा करेपर्यंत बसने वेग घेतला आणि ती डेपोच्या बाहेर पडली.
आम्ही पिशवी उघडून पाहिलं तर आत मुरुडचे पेढे होते. परबांनी ते प्रेमाने भेट म्हणून दिले होते. आम्ही इतक्या वर्षानीही त्यांची आठवण ठेवली याचा त्यांना आनंद झाला होता, म्हणून ते सकाळी पेढे घेवून बस स्थानकावर आले होते. पण बस सुटल्यामुळे आम्हाला त्यांच्याशी दोन शब्दही बोलता आले नाहीत.
तिसऱ्या वेळी खास परबांना भेटायला आम्ही मुरुडला गेलो. पण मुरुड आरपार बदललं होतं. मुरूडच्या सागरी किनाऱ्याला लोक चौपाटी म्हणू लागले होते. किनाऱ्यावर हॉटेल उभे राहिले होते आणि परबांच्या खानावळीच्या जागेवर एक इमारत उभी राहिली होती. मुरुडचा रस्ता आता पूर्वीसारखा मोकळा राहिला नव्हता. तिथे पार्किंगच्या जागा तयार झाल्या होत्या. या सगळ्या पसाऱ्यात आणि tourist च्या गर्दीत परब कुठे गेले होते कोणालाही माहित नव्हतं. पानवाल्याला विचारलं, तर तोच उत्तर प्रदेशचा निघाला. परबांची त्याला काय माहिती असणार?
त्या सगळ्या गर्दीत सागरी किनारा आणि परब हरवून गेले होते.
जेवण्यासाठी आम्ही एक हॉटेल निवडलं. वेटर आला तर त्याच्या गळ्यात चक्क टाय लावलेला होता आणि त्याने "सर" म्हणून सुरुवात केली. नंतर त्याने जेवण आणलं खरं पण त्यात परबांसारखा आपलेपणा नव्हता. सोलकढी होती पण ती नारळ-कोकमापेक्षा पाण्याची जास्त होती आणि आणखी सोलकढी घ्या असा आग्रह नव्हता. उलट एक्स्ट्रा सोलकढीला जादा चार्ज पडेल असा इशारा दिला होता.
गाड्या आल्या. पाहुणे tourist झाले. फोन आले, बुकिंग सुरु झालं. हॉटेल आले आणि खानावळ संपली. मुरूडची मुंबई झाली. परब गायब झाले आणि "भाऊ" ही हाकही घेवून गेले. विसंगती अशी की जेव्हा चांगली माणसे होती, तेव्हा फोन नव्हते आणि कॅमेराची सोय नव्हती. आता फोन-कॅमेरा आणि social media आहे तर चांगली माणसे सहज सापडत नाहीत.
परबांचा फोटो असता तर आज what’s app वरून फिरवला असता. कदाचित परब पुन्हा एकदा सापडले असते आणि " भाऊ, तुम्ही मला शोधत आलात !!" असं म्हणून त्यांनी आम्हाला पुन्हा आग्रह करून सोलकढी पाजली असती. पुन्हा एकदा पेढे दिले असते.
नाहीतरी हेच खरं आहे की साधीभोळी माणसं ही सोलकढी किंवा पेढे असतात. काही दिवस टिकतात आणि नंतर आठवणी मनाच्या कोपर्यात ठेवून निघून जातात. अशा माणसांचा पत्ता नसतो, मोबाईल नंबर नसतो, त्यांचा ईमेल आयडी, फेसबुक प्रोफाइल नसतो. पण ते कुठे ना कुठे असतात. आपल्याला प्रेम देतात, जगात कितीही उलाढाल्या झाल्या, लांड्यालबाड्या झाल्या, जगात माणसे एकमेकांना फक्त सोशल मीडियावर भेटू लागली तरी परबांसारखी माणसेही असतात. जी प्रत्यक्ष भेटतात आणि काळजाला भिडतात.
परब आता कुठे आहेत हे माहित नाही. जर ते तुम्हाला भेटले तर ह्या जगात चांगली, भोळीभाबडी माणसेही आहेत ह्यावर तुमचा विश्वास बसेल. हे जग अश्याच सरळ सध्या, गोड माणसांमुळे टिकून आहे ह्याची खात्री पटेल.
कोकणातील साधी जीवनशैली दाखवणारा हा लेख .
लेखक : निरेन आपटे.
कोकणातील साधी जीवनशैली