होय, गाव बदलत चाललंय. आपल्या लहानपणीच गाव आता बदलत चाललंय. लहानपणी दिसणारी कौलारू घरांची जागा आता सिमेंटच्या पत्र्यानी घेतली आहे. घरांच्या दगड आणि मातीच्या भिंतीच्या जागा आता चिरेबंदी दगडांनी आणि विटांनी घेतली आहे. ती कौलारू घरातील उब आणि सुंगध या सिमेंट विटांच्या घरात कुठेतरी हरपून गेला आहे. कारण आपलं गाव बदलत चाललंय आहे.....
ज्या घरातील चुलीवर पाहिलं जेवण शिजवलं जायचं तीच चूल आता घराबाहेर ओस पडलेली दिसते. त्या चुलीची जागा आता गॅस वर चालणाऱ्या शेगडीने घेतली आहे. पण सकाळचा
बनणाऱ्या चुलीवरील उकळत्या चहाचा वास आणि चव या शेगडीवरील चहाला येत नाही. कारण आपलं गाव बदलत चाललंय आहे....
ज्या जात्यावर सकाळी लवकर उठून पीठ काढलं जायचं, त्याची जागा आता पीठ पाडणाऱ्या गिरणीतील चक्कीने घेतली आहे. ज्या जात्यातून पीठ दळून त्याची भाकरी भाजली जात होती, त्याची जागा आता चपातीने घेतली आहे. कारण आपलं गाव बदलत चाललंय आहे.....
पूर्वी गावातील लोकांची सकाळ हे कोंबड्याच्या आरवण्याने होत असे. पण आता मोबाईल मधील घड्याळाच्या गजराने होते. कारण आपलं गाव बदलत चाललंय आहे.....
पूर्वी घरातील गृहिणी सकाळी लवकर उठून विहिरीवर पाणी भरायला जायच्या. पण त्याच गृहिणी आता नळाच्या रांगेत उभ्या असताना दिसतात. पण विहिरीतील पाण्याची चव हि नळाच्या पाण्याला येणार नाही. विहिरीतील पाण्यातील शिजवलेलं जेवणाची चव हे नळातील पाण्यातील जेवणाला येणार नाही. पण काय करणार आपलं गाव बदलत चाललंय आहे.....
लहानपणी गोठ्यातून गाईच्या आणि तिच्या वासराचा येणारा आवाज आता ऐंकू येईनासा झाला आहे. गोठी आता ओस पडू लागली आहेत. कारण आपलं गाव बदलत चाललंय आहे......
लहानपणी मे महिन्यात जाऊन आंब्याच्या झाडावर पिकलेला आंबा पाडण्यात आणि फणस काढून त्यामधील गरे खाण्यात जी मजा असायची ती मजा आता दिसत नाही. कारण ती जागा आता मोबाईलने घेतली आहे. रानात बागडणारी मुले आणि नदीत मनोसोक्त पोहणारी मुले आता मोबाईलमध्ये रमली आहेत. कारण आपल गाव बदलत चाललंय आहे.....
काळाच्या ओघाप्रमाणे बदल हा हवाच. कारण आजच्या आधुनिक युगात टिकून राहायचं असेल तर बदल हा हवाच. पण त्याचबरोबर आपल्या जुन्या प्रथा आणि परंपरा ही टिकवून ठेवणे हे देखील काळाची गरज आहे हे देखील विसरून चालणार नाही असं मला वाटत. पण काय करणार कारण आपलं गाव बदलत चाललंय आहे.....
©देवचंद रेवाळे
गाव बदलत चाललंय