आंब्याचा रायता कोणी कोणी केला रे यंदा ? ह्यो प्रश्न विचारलो तर बर्याच जणांचा उत्तर आसता यंदा अवषधाक देकून रायवळ आंबो खय दिसना नाय...! बरोबर मा गाववाल्यांनू? बरा असा उत्तर गावला म्हणान आंबे लागाक नायत असा बिलकूल नाया हा खरा कारण हा येगळाच हा आणि तेका पण आम्हीच कारणीभूत आसव....कशे ते सांगतयच पुढे.
बर्याच जणांचो हापूस हयो फस्ट लव्ह पण आमचो रायवळ is फस्ट लव्ह.... ह्या रायवळ आंब्याची रायवळ, झाडी, चोकूचे, बिटके अशी बरीच नावा झय-थय घेतली जातत. आणि कारणा पण तशीच हत. आज हापूस, पायरी शिवाय आम्ही खानवच नाय आणि तेका कारण पण तसाच शेवटी चवीक ह्योच बाप सगळ्यांचो. पण खरा सांगूच तर माका बिलकूल अप्रूप नाय हेचा. हापूस खाल्लव तरी झाडी आंब्यावरचो जीव अजीबात कमी होवचो नाय आणि तेका कारणा पण तशीच हत. ल्हानपणी आमची हौस , जिभेचे चोचले,पोट जर कोणि भरला असात तर ह्या रायवळ आंब्यानीच. मामाच्या घराकडे बरीच रायवळ आंब्याची झाडा आणि प्रत्येकाक नावादेकून वेगळीच. ही नावा एकतर तेंच्या चवीन , आकारान नायतर तेच्या जागेन पडलेली. मामाच्या दारात होतो तो "पोटफुगो" (आकारान तसोच) आंबो, पाटल्यादाराक होते ते "पिटयाळो" (चवीक पिठूळ मस्त), "बिटकी" आणि मिरमिरो आणि बाजूच्या घराकडे होतो तो "घोटाचो" आंबो. हे सगळे आंबे जर खावचे असतीत तर एकच 'अलिखित' अट होती ती म्हणजे फाटफटी भिनभिनाक उठान पिशये भरून ते आणूचे लागत वायच उशिर झालो तर तॉंड रडयेला करून परताचा लागा आणि न्हेणार्याच्या नावान मनातल्या मनात गाळये. बरा ही झाडा घरांडेगेची झाली पण शाळेत जावच्या वाटेवरची येगळी , खेळाक जावच्या वाटेवरची येगळी, रानातली नायतर डोंगरेतली ही सगळी रायवळाची झाडा बिनकागदोपत्री आपल्या मालकीची...
घरातली साठी( आंबापोळी), लोणची, भेतका (खारात कापून घातलेले अांबे), सुकयलेला आंमटान, तोराची कडी, तोराची चटणी, आम्ही केव्हाच हापूस चे खावक नाय. सगळे मिजाशी कोणी पुरयले असतीत तर ह्या रायवळानच. हा आणि याक सांगुचाच रवला जा रायवळ आंब्याशिवाय होनाच नाय.....ओ कायता म्हणान काय ईचारताय? ताच ओ आंब्याचा रायता....! बरा आजून एक महत्वाची गोष्ट, जेच्यावरना तुमची परिक्षा पण होव शकता आणि तुम्ही जर हेच्यात फेल झालाय तर तुम्ही फक्त नावाचे मालवणी ह्यो धब्बो लागा शकता... ती परिक्षा म्हणजे (किंवा कसब म्हणा ना) म्हणजे तूम्ही रायवळ आंबो कसो खाताय ...! जर पुर्ण आंबो खावन झाल्यार आंब्यांची बाट (पायरी) जर पिवळी रवली तर तुम्ही परिक्षेत फेल.... कारण रायवळ आंबो खाणारो पायरी चोकून चोकून अगदी धूतत तशी सफेद करूनच फेकतलो...आणि ह्यो रायवळ आंबो खावचो अलिखित नियम आसा ह्या पण महत्वाचा हा....
आंबो खाताना देटातना डिक थोडो पिळून टाकायचो तेका दाबून दाबून नरम करायचो म्हणजे तोंडाक लायल्यार सगळो रस सुर्ररर~~~ करुन ओढूक गावा होयो. बरा खायसर केव्हा रस हाताच्या कोपरापर्यंत केव्हा येय ह्यापण समजा नाय.... खावन पॉट भरला काय मग दातात अडाकलेले बाटीचे दोर हातान नाय तर काटयेन काढीत निवांत बसायचा .....
आहा...काय ते दिवस होते...!
मग अचानक वर्तमान काळात येतव आम्ही आणि समजता ल्हानपणी खाल्लेलो येक्कय आंबो आता अस्तीत्वात नाया.... कारणा काय तर तो तोडून थय काजीची हापूस ची कलमा लायली, नायतर म्हातारो मेलो म्हणान तेका तोडून घातलो .... आज हापूस खातव आम्ही ताव मारून पण कसलो तर मुळात करटाल घातलेलो आणि वर फवारणी केलेलो. पण कसल्याच फवारणीचो नैसर्गिक पिकलेलो रायवळ आता आमका नको झालो हा.... लावक रायवळ नको , जतन करूक रायवळ नको पण सरणार जाळूक रायवळच आंबो होयो. खरा मा बोल्लय ता? असो....
फवारणीन आज जी किटकांची साखळी होती ती बाधीत झाली हा. फवारणीन आम्ही कलमांचा फळ वाचवलव पण वयल्या किटकांनी दुसर्या झाडाकडे मोर्चो वळवल्यानी. कलमांका तारणारो रायवळ होतो पण तोच आता खय दिसना नाय. अन्नसाखळी आपण बाधीत करतव पण निसर्ग तो समतोल करुचो प्रयत्न करता आणि तेच्यात मात्र आजून खयच्या तरी अन्नदात्या झाडाचो बळी जाता. हायवे झालो आणि रस्त्याच्या डेगेक असलेली जवळपास १००च्या वर रायवळाचे प्रजाती नष्ट झाले. रायवळाचे प्रजाती किती हत ते माका नक्की म्हायत नाय पण जेव्हा मी खाल्लेल्या आणि बघलेल्या रायवळ आंब्याचो हिशोब घालतय तो शंभरी गाठून पार जाता...
वेळ आजूनय जावक नाया खावचो हा हापूस तूम्ही खूशाल खाया पण खावच्यासाठी नको पण आपणाक मेल्यार आंबो घालूक गावाक होयो म्हणान तरी रायवळ आंब्याचा झाड लावया आणि तेची सुरवात यंदापासूनच करया....
रायवळ आंबा