रानमाणूस

Payal Bhegade
18 May 2024
Blog

तिलारी च्या जंगलातील ही एक सुंदर सकाळ..आज World wildlife Day
दुर्दैवाने आज तळकोकणात वाइल्डलाइफ विरोधात संघर्ष करण्याची वेळ स्थानिकांवर येत आहे त्याबद्दल थोडक्यात मत मांडतो आहे..
सावंतवाडी दोडामार्ग वाइल्डलाइफ कॉरिडॉर हा पश्चिम घाटाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात येतो. असंख्य दुर्मिळ पक्षी प्राणी औषधी वनस्पती मोठे वृक्ष असलेला हा भाग जैव विविधतेचा हॉटस्पॉट आहे..तिलारी खोरे सह्याद्रीच्या संवेदनशील भागातील १०गावे विस्थापित होऊन धरण झाले आणि आज उरलेल्या गावातील जंगल क्षेत्र नष्ट करून रबर अननस काजू केळी च्या शेकडो एकर च्या बागा उभ्या राहत आहे..व्यावसायिक शेती चा केरळ पॅटर्न दोडामार्ग तालुक्यात सगळीकडे जोमाने पसरला आहे..
नदी, धरणाचे कालवे ,पाटबंधारे प्रकल्प ह्यामुळे पाण्याची मुळीच कमतरता नाही..एका तिलारी नदीचे पाणी अख्ख्या तालुक्यात वर्षभर वाहत राहील अशी सोय धरणाने केली आहे..मग काय घ्या जेसीबी ,तोडा जंगल ,संपवा डोंगर लावा अननस ..काही ठिकाणी नदीच्या पुर रेषेच्या आता केळी अननस लावून प्रचंड पैसा मिळवण्याची गणिते आपला कोकणी माणूस जुळवतो आहे..त्यात मायनिंग, क्रशर ,लाकूड व्यापार ह्यासाठी होणारा विनाश वेगळाच..दोन तीन गावात क्रशर वाल्याने देऊळ बांधून दिले म्हणून गावाच्या मालकीचा अख्खा डोंगर त्याला खडी काढायला दिला अश्या घटना घडल्यात ..
ह्याच धरण क्षेत्रात पाणी तुंबवून ठेवल्याने मागच्या वर्षी झालेल्या extreme heavy rainfall मध्ये कोकणातला सगळ्यात मोठा पूर येऊन गेला ज्याचे वन्य जीवना वरचे परिणाम कोणी तपासले सुद्धा नाहीत..
एकूणच निसर्गाला ओरबडण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू आहे ..
निसर्गाची इतकी लूट केल्यानंतर हत्ती गवे रानडुक्कर यांसारखे वन्य प्राणी आता स्थानिकांच्या बागेत घुसायला लागल्यावर "वन्य प्राण्यांचा सरकारने बंदोबस्त करावा नायतर आम्ही उपोषण आंदोलने करू" आसा पवित्रा आम्ही घेतला आहे..मान्य आहे चूक कोणा एकट्याची नाही जंगल कोणी एकट्याने तोडल नाही ..अरे पण ते वाचवायला तरी कोणी आला होता का?? जेव्हा डोंगर विकले आणि त्यांची राख रांगोळी केली तेव्हा का नाही उपोषणे झाली??..ज्या गावात आपण राहतोय तिथे हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी शेती भाती केली उत्तम जीवन जगले , त्यांना का नव्हता प्राण्यांचा कधी त्रास??मागच्या २०-२५वर्षातच हा संघर्ष का उभा राहिला , ह्या सगळ्या वर अंतर्मुख होऊन विचार करायची खूप गरज आहे..
.biodiversity hotspot मध्ये राहणाऱ्या लोकांनी कस जीवन जगायचं असत हे ज्ञान आमच्या जुन्या पिढीला होते मग आम्ही आमचं निसर्ग जीवन उद्ध्वस्त करून कोणती प्रगती करणार आहोत ह्याचा विचार माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांनी करावा.
कोकणात जे काही कराल ते शाश्वतच असायला हवे..मग ती शेती असो किंवा पर्यटन असो ..नायतर वन्य प्राणी विरुद्ध कोकणी माणूस हा नवा संघर्ष उभा राहील