बांबूचे कोंब
कोकणात सर्वत्र बांबूची झाडे आढळतात. जंगली भागातही अनेक ठिकाणी बांबूची झाडे दिसतात. पावसाळ्याच्या सुरुवातीस बांबूच्या बेटात नवे कोंब उगवतात. साधारण फूटभर उंचीचे कोवळे कोंबच भाजी करण्यासाठी उपयुक्त असतात. हे कोंब त्यापेक्षा अधिक वाढले की, त्यांचा भाजीसाठी उपयोग होत नाही. वर टोकदार सालींनी गुंडाळलेले कोवळे कोंब मुळाशी कापून भाजीसाठी आणतात. हे कोंब सोलून आतला पांढरट गर तासून भाजीसाठी वापरला जातो. या कोवळ्या नाजूक गराच्या बारीक फोडी करून त्याची भाजी केली जाते. काही वेळेस हा गर किसणीवर किसून त्याच्या किसाचीही भाजी केली जाते. ज्याप्रमाणे आपण चणे, वाटाणे यांची उसळ करतो त्या पद्धतीने या गरांची पातळ भाजी होते. किसलेल्या गराची सुकी भाजी करतात. आम्लपित्ताच्या अनेक विकारांवर ही भाजी गुणकारी आहे. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीस पंधरवडाभर अशी बांबुच्या कोंबांची भाजी करण्यास योग्य असते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी अशा बांबुंच्या कोंबांची भाजी अवश्य खायला हवी. पावसाळ्यातील रानभाज्या ही निसर्गाची अनमोल देणगीच आहे. बहुसंख्य रानभाज्या आरोग्यास हितकारक व विविध विकारांवर गुणकारी आहेत. याशिवाय या सर्व रानभाज्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. कोणत्याही रासायनिक खताशिवाय वाढलेल्या अशा नैसर्गिक रानभाज्या आपण पावसाळ्यात अवश्य खायला हव्यात.
कोकणातील रानभाजी बांबूचे कोंब